Skip to main content
Aakhati Ratna

आखाती रत्न

Prabhakar Petkar

श्री.प्रभाकर रामचंद्र पेठकर

हॉटेल व्यवसाय साधारणपणे दक्षिणेकडील लोकांनी वलयांकित केलेला व्यवसाय म्हणून सर्वत्र प्रचलित. पुणे , मुंबई येथील काही प्रथितयश असे मराठी हॉटेल व्यावसायिक सोडले तर ह्या व्यवसायात खूपच कमी मराठी लोक दिसून येतात. अशात परदेशात जायचे ते देखील आखाती देशात आणि स्वत:चे हॉटेल सुरु करण्याचा विचार तो देखील २५ वर्षांपूर्वी करायचा आणि आज एक प्रस्थापित व्यावसायिक म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे हि खरच विलक्षण अशी गोष्ट जी श्री.प्रभाकर रामचंद्र पेठकर यांनी मस्कत मध्ये राहून प्रत्यक्षात आणली. तर अशा ह्या विलक्षण अवलिया व्यक्तिमत्वाची ओळख आखाती मराठी संकेतस्थळावर सुरु करण्यात आलेल्या " आखाती रत्न " ह्या मालिकेत आपणासमोर करून देत आहेत मस्कत मध्ये गेली ११ वर्षे राहत असलेल्या सौ. वृचिता कर्णिक.

सौ. वृचिता कर्णिक ह्या मानस शास्त्र विषयाच्या पदवीधर असून , मस्कत मध्ये सोशल कार्यात त्यांचा सक्रिय सहभागी असतो. त्याचबरोबर आखाती मराठी साठी देखील त्यांचे नेहमीच सहकार्य मिळत असते.

आखाती मराठी - नमस्कार ! आखाती मराठी च्या माध्यमामुळे आपल्या मुलाखतीचा एक अपूर्व असा योग आज जुळून येत आहे आणि आपण त्यासाठी जे सहकार्य केलेत त्यासाठी आपले मन:पूर्वक धन्यवाद. माझ्या माहितीप्रमाणे मस्कत मध्ये येण्यापूर्वी तुम्ही मुंबईत नोकरी करत होतात तर त्याबद्दल आणि तुमच्या सुरवातीच्या भारतामधील काळाबद्दल काय सांगाल.

Mumbai Corner Muscat

श्री.पेठकर - सर्वप्रथम आपले धन्यवाद आणि अशा प्रकारच्या उपक्रमाबद्दल आपले खरच कौतुक.

मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात माझा जन्म झाला. दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि सर्वसाधारण मराठी माणसाच्या वृत्ती नुसार नोकरी करण्यास सुरुवात केली. दहिसर मध्ये क्रॉम्पटन कंपनीत ऑफिस मदतनीस म्हणून रुजू झालो. नोकरीचे वैशिष्ट्य म्हणजे ऑफिस बाहेरची काम जास्त त्यामुळे प्रवास खर्च मिळणे तो थोडा वाढवून घेणे अशा सर्व गोष्टींमुळे मी त्या नोकरीत खुश होतो.

मनापासून सांगायचे तर ह्या नोकरीत कारकून होण्यासाठी जी महत्वाकांक्षा असावी लागते ती पुरेपूर माझ्या अंगी बाणवली गेली होती. अशातच ऑफिस मध्ये गोखले नावाचे एक सहकारी होते त्यांनी माझी चांगलीच कान उघडणी करून मला ऑफिस मध्ये काम करण्याचा सल्ला दिला. मुळ उद्देश हा कि मी नवीन गोष्टी शिकाव्यात. एकाअर्थि त्यांचा हा सल्ला माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. मुख्य म्हणजे उच्च शिक्षण असणे कसे महत्वाचे आहे ह्याचे आकलन झाले. कारण पदवी नसल्यामुळे प्रगती मध्ये अडथळे येत होते. त्यामुळे मी लगेचच नोकरी करत असताना पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. ह्या काळात मला आईची शिकवण सतत प्रेरणा द्यायची. फक्त ७ वी पर्यंत शिक्षण झालेले असूनही माझ्या आईकडे एक विलक्षण असा व्यावसायिक दृष्टीकोन होता. त्याच बरोबर ती नेहमी म्हणायची,

" माणसाचे जीवन हे नदीप्रमाणे असावे, सागराला मिळण्याचे तिचे ध्येय ती कितीही अडथळे आले तरी पूर्ण करतेच"

त्याचप्रकारे आपणही आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी अपार मेहनत घेणे खूप महत्वाचे आहे.आजही हीच शिकवण घेऊन मी माझी वाटचाल सुरु ठेवली आहे.

ह्याच सुमारास माझे ऑफिसचे वरिष्ट श्री सोपारकर ह्यांनी मला मस्कत मध्ये नोकरी ला येण्याची ऑफर दिली. एक म्हणजे आखाती देश त्यातही मस्कत शहर ज्याबद्दल खास असे काहीच माहिती नाही फक्त दुबई च्या जवळ आहे इतकीच काय ती माहिती मात्र सोपारकर ह्यांनी सांगितलेली एक गोष्ट सतत उर्जा द्यायची एक नवीन संधी म्हणून हि नोकरी स्वीकार तुझी स्वप्न लवकर पूर्ण होतील , तुला जर काही व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच तुला ह्याचा फायदा होईल.

तर अशा वातावरणात १९८१ साली माझे मस्कत मध्ये आगमन झाले. अकांउंटस मधली नोकरी मुख्य म्हणजे तेव्हा ऑफिस मध्ये संगणक नव्हते. सुरवातीला खूप जड गेले. अशातच एक दिवस ऑफिस मध्ये संगणक आले आणि त्याचक्षणी मी ठरवले ह्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा. मी प्रोग्रामिंग शिकण्यास सुरुवात केली. foxpro,कोबोल, लोटस १२३ ह्या संगणक प्रणाली देखील स्वतः शिकून घेतल्या आणि अकांउंटस साठी काही छोटे प्रोग्राम बनवले आणि साहेबांना दाखवले मुख्य करून पेटी कॅश चा प्रोग्राम जो वापरून बघितल्यावर आमच्या साहेबांनी मला विचारले कि हा प्रोग्राम तू ऑफिस साठी देशील का ? माझ्या डोक्यात व्यवसाय होताच त्यामुळे लगेच मी प्रोग्राम ची किंमत सांगितली आणि अशा प्रकारे माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली.

आखाती मराठी - एकंदरीतच तुमची वृत्ती हि व्यावसायिकाची हे तुम्ही सांगितलेत मात्र कॉम्प्युटर च्या संदर्भातील व्यवसाय ज्यात तुमचे शिक्षण झाले होते ते सोडून एखादे सुपर मार्केट चालवायला घ्यायचे ते पण परदेशात हे कसे काय घडले ?

श्री.पेठकर- अगदी योग्य असे बोललात पहिल्या पासूनच माझी वृत्ती हि एका व्यापाऱ्याची होती. नोकरी करत असताना देखील मी सतत व्यवसाय कसा सुरु करता येईल हाच विचार करायचो. जेव्हा पहिला प्रोग्राम बनवला आणि तो चांगल्या किंमतीत विकला गेला तेव्हा मला मोठा हुरूप आला . नोकरी करत होतो पण अशा प्रकारचे व्यवसाय करत होतोच अशीच ५-६ वर्षे झाली आणि मनाशी निश्चय केला आता नोकरी नाही करायची आता पूर्णवेळ व्यवसाय करायचा. मात्र व्यवसाय काय करायचा इथपासून तयारी होती.कारण कॉम्प्युटर संदर्भातील व्यवसाय करून बघितला होता आणि त्याकाळी त्यात तितकेसे यश मिळाले नव्हते. शेवटी एक सुपर मार्केट चालवायला घ्यायचे निश्चित केले. माझे जे sponsor होते त्यांनी मला ह्यासाठी खूप मदत केली आणि १९८८ सालि मी माझे सुपर मार्केट सुरु केले. नवीन व्यवसाय त्याबद्दल तितकी खास माहिती नाही, मात्र उत्साह दांडगा काहीही करायची तयारी आणि त्यात धंदा पण बऱ्यापैकी होत होता त्यामुळे बरकत होत होती आणि अशातच इराक आणि कुवेत च्या युद्द्धाची सुरवात झाली आणि त्याचे थेट परिणाम धंद्यावर दिसू लागले. रोखीचा व्यवहार सुरु झाला. लोकांचे मायदेशी जाणे सुरु झाले कित्येक नवीन प्रोजेक्ट बंद झाले आणि आपसूकच मला माझे सुपर मार्केट बंद करावे लागले.

आखाती मराठी - मला वाटत एकाअर्थी सुपर मार्केट बंद झाले हे तुमच्या पथ्यावरच पडले कारण त्यामुळेच तुमच्या आजच्या यशस्वी हॉटेल व्यवसायाचा पाया घातला गेला असे म्हटले तर ते वावगे ठरणार.

श्री.पेठकर - तुम्ही म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे कारण सुपर मार्केट बंद झाल्यावर काय करायचे हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर होता एक निश्चित होते पुन्हा नोकरी करायची नाही. त्याचवेळी माझ्या साठी गुरुतुल्य असणारे श्री .डी जे संपत ह्यांनी दिलेला सल्ला माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरला.

" जी तुझी आवड असेल तोच व्यवसाय तू कर, त्यात तुला यश मिळेल."

आणि नेमकी ह्याचवेळी एक संधी चालून आली. ह्यावेळी देखील माझे जे sponsor होते त्यांनी मला पेट्रोल पंपावरील एक कॅफेटेरिया चालवण्यासाठी विचारणा केली. एकंदरीत सर्व गोष्टी विचारात घेऊन मी पाव भाजी आणि बटाटा वडा असे दोन पदार्थ विकण्याचे निश्चित केले. अगदी मनापासून सांगायचे तर मला स्वत:ला खाण्या पिण्याची आणि मुख्य म्हणजे लोकांना प्रेमाने खाऊ घालण्याची भारी हौस. त्यामुळे ह्या व्यवसायात माझ्या ह्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या.

अशाप्रकारे माझा पहिला कॅफेटेरिया ३ टेबल घेऊन सुरु झाला. पदार्थ पण निश्चित केले आता ते बनवायचे कसे ? मी स्वत: एक चांगला आचारी होतो त्यामुळे बटाटे वडे बनवण्याची जबाबदारी मी स्वत:कडे घेतली आणि पाव भाजी बनवण्यासाठी मुंबईहून कुक घेऊन आलो त्यात पण मी अत्यंत चोखंदळपणे कुकची निवड केली शब्दश: सांगायचे तर एकूण २८ कुक तपासल्यावर २९ वा कुक मी घेऊन आलो. ह्याचे कारण म्हणाल तर पदार्थाच्या चवीत मला कुठलीही तडजोड मान्य नव्हती. मुख्य म्हणजे माझ्या व्यवसायाचे हेच धोरण मी आजतागायत पाळत आलो आहे एकवेळ पदार्थांच्या किंमती थोड्या वाढल्या तरी चालेल पण पदार्थाच्या बाबतीत त्याच्या दर्जा शी कुठलीच तडजोड मी केली नाही.

वर सांगितल्याप्रमाणे मी बटाटे वडे स्वत: करायचो आणि कॅफेटेरिया मधील इतर कामे पण करायचो. मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मस्कत मध्ये गुजराथी लोकांची संख्या पहिल्यापासून खूप आहे त्यामुळे मुंबई मध्ये गुजराथी शिकल्याचा मला माझ्या व्यवसायात खूप फायदा झाला. गुजराथी गिऱ्हाइकांची संख्या पण खूप होती आणि त्यात गुजराथी मध्ये बोलत असल्यामुळे एक प्रकारची जवळीक साधता येत होती.

एकंदरीत कॅफेटेरिया च्या व्यवसायात माझा चांगला जम बसत होता. ईदच्या सुट्टीत तर खूपच गर्दी व्हायची. ह्याचवेळी मी पदार्थांची संख्या वाढवायचे निश्चित केले आणि त्याप्रमाणे खास समोसे बनविणारा कुक घेऊन आलो त्याचबरोबर इतर खास मराठी पदार्थ म्हणजेच मिसळ, साबुदाणा वडा त्याचबरोबर दाक्षिणात्य पदार्थ म्हणजेच इडली /डोसा ह्यांचा पण समावेश केला. जेणेकरून सर्व प्रकारचे लोक कॅफेटेरिया मध्ये यावेत. असे करता करता ३ टेबल ची संख्या १० पर्यंत वाढत गेली.

एक गोष्ट मनापासून सांगायची तर हॉटेल व्यवसायाचा कुठलाही अनुभव नसताना मी हा व्यवसाय करण्याचे धाडस केवळ आणि केवळ आवड म्हणून केले होते. मात्र असे असतानाही एक गोष्ट कायम जपली ती म्हणजे ' सेवा वृत्ती '. ह्या व्यवसायाचे यश जर कशात दडले असेल तर तुमच्याकडे असलेली ' सेवा वृत्ती ' मुख्य म्हणजे दुसऱ्याला खाऊ घालण्याची आवड असणे हे खूप महत्वाचे आहे.

आखाती मराठी - वर तुम्ही दर्जा बद्दल उल्लेख केलात मुख्य म्हणजे कुठलीही तडजोड तुम्हाला मान्य नाही तर अशाप्रकारे हॉटेल चा धंदा तो इतक्या सचोटीने करत असताना आपली पत राखण्यासाठी काही खास प्रयत्न केलेत का ?

श्री.पेठकर- एक गोष्ट मी सतत सांगेन ती म्हणजे हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला खाण्यापिण्याची खूप आवड हवी आणि जर ती असेल तरच तुम्ही हा व्यवसाय यशस्वी करून दाखवाल. ह्याचे एक कारण म्हणजे तुम्ही स्वत:ला जेव्हा गिऱ्हाइकाच्या रुपात पाहता तेव्हा तुम्हाला त्याची आवड , निवड लक्षात येते. मात्र ह्याच बरोबर तुमच्याकडे एक खास गुण असणे देखील खूप मह्त्वाचे आहे तो म्हणजे ' चवीचे ज्ञान ' . ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांवर कंट्रोल ठेवणे शक्य होते.

पत राखण्याबाबत एक किस्सा सांगायचा तर एकदा काही लोक आमच्याकडून पाणी पुरीचे पार्सल घेऊन जाण्यासाठी आले, ते निघून गेल्यावर माझ्या असे लक्षात आले कि त्यांनी पाणी पुरीचा प्रमुख घटक म्हणजेच ' पुदीनाचे पाणी ' तेच नेले नाही मग साधारण अंदाज बांधून मी त्यांचा माग काढून त्याना भेटून पाणी देऊन आलो. सांगायची गोष्ट काय तर त्यानंतर कित्येक वर्षांनी मला त्या ग्रुप मधील एक व्यक्ती भारतात भेटली आणि त्यानी अगदी आवर्जून मला हि आठवण सांगितली. मला वाटत पत म्हणतात ती हीच.

पदार्थांचा दर्जा सांभाळताना मी नेहमीच प्रत्येक गोष्ट मनापासून केली. पहिल्या हॉटेलमध्ये व्यवस्थित जम बसला आणि मगच ३ वर्षांपूर्वी अल खुवैर मध्ये ' मुंबई कॉर्नर ' नावाने दुसरे हॉटेल सुरु केले खर म्हणजे हे मी खूप आधी करू शकलो असतो पण कुठलीही तडजोड करणे माझ्या स्वभावात नसल्यामुळे मी योग्य वेळ आल्यावर नवीन हॉटेलचा विचार केला. आता लोकांची आवड आणि खास मराठी जेवणाची असलेली गरज लक्षात घेऊन मालवणी खाद्यपदार्थ मिळतील असे तिसरे हॉटेल लवकरच सुरु करत आहे.

एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख करावाच लागेल तो म्हणजे ओमान मध्ये स्थानिक लोकांना देखील आपले भारतीय पदार्थ खूप आवडतात आणि आवर्जून ते हॉटेलला भेट देतात.

आखाती मराठी - मधल्या काळात तुम्ही पुण्यामध्ये सिंबोयसिस कॉलेज चा कॅफेटेरिया चालवायला घेतला होतात तर त्यावेळचा भारता मधला अनुभव कसा होता ?

श्री.पेठकर- कॉलेज चा कॅफेटेरिया आणि १ वर्ष यज्ञकर्म नावाचे हॉटेल पुण्यात चालवले. अनुभव म्हणाल तर तसा खूप काही खास नव्हता एक म्हणजे सरकारी यंत्रणा त्यांचे कागदोपत्री नियम आणि इतर अनेक गोष्टी त्यात NRI स्टेट्स साठीचे नियम आणि इतर खूप बरे वाईट अनुभव ह्या सर्वांमुळे मी ते हॉटेल बंद केले आणि मस्कत मधील व्यवसाय पुढे नेण्याचे निश्चित केले.

आखाती मराठी - नवीन पिढीला प्रामुख्याने ह्या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल ?

श्री.पेठकर-सर्वात महत्वाचे म्हणजे ' स्पर्धेची तयारी ' ठेवा कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची जिद्द बाळगा. तुमच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहा आणि कोणाचीही कॉपी नका करू. हॉटेल व्यवसाय हा पूर्णपणे अवलंबून आहे तो तिथल्या चवीवर आणि ती चव कायमस्वरूपी तशीच कशी राहील हे पहा. आजही आमच्याकडून परदेशात जाताना लोक काही ठराविक पदार्थ घेऊन जातात आणि आवर्जून आमची आठवण काढतात. मला वाटत ह्याहून मोठी पावती ती काय असेल.

mumbai-corner-muscat

ह्याचबरोबर तुमच्याकडे काम करणारे नोकर जे तुमच्या व्यवसायाचे अविभाज्य घटक आहेत त्यांना योग्य त्या सन्मानाने वागवा. त्यांच्या गरजा समजून घ्या प्रामुख्याने परदेशात राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी कटाक्षाने पाळणे खूप गरजेचे आहे. हॉटेल व्यवसाय एक विशिष्ट असा व्यवसाय त्यामुळे आपल्या मराठी माणसाने ह्या व्यवसायात येताना आपले सर्व दुर्गुण झटकून मेहनत घेण्यावर भर द्यावा.

आखाती मराठी - निश्चितच आज ह्या मुलाखती द्वारे श्री.पेठकर ह्यांच्या हॉटेल व्यवसायाची इत्यंभूत अशी माहिती तर मिळालीच त्याचबरोबर त्यांच्या दुर्दम्य अशा इच्छा शक्तीची ओळख पण झाली. पुन्हा एकदा श्री.पेठकर ह्यांचे आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद….

सहकार्य

महाराष्ट्रात कित्येक NGO अशा आहेत कि त्यांच्याबद्दल त्यांच्या मार्फत केल्या जाणाऱ्या कार्याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती उपलब्ध आहे. साधारणपणे आपले काम हीच आपली ओळख ह्या उदात्त हेतूने ह्या संस्था अहोरात्र झटत असतात. अशा संस्थांची ओळख जास्तीतजास्त लोकाना व्हावी, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती सर्वदूर पोहोचावी आणि त्यांच्या कार्यात लोकांचा सहभाग वाढवा ह्या उद्देशाने आम्ही आमच्या संकेतस्थळातर्फे "NGO - आखाती मराठी सहकार्य" हा उपक्रम सुरु करत आहोत.

Know More